व्याख्याकोश

(लेखांत आलेल्या शब्दांच्या व्याख्या/स्पष्टीकरणं)

अ… (↓↑) 

अग्निजन्य खडक (igneous rocks): अग्निजन्य खडक हे शिलारस, थंड होऊन घट्ट होण्यामुळे निर्माण होतात. यांतील ग्रॅनाइटसारखे खडक हे, शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याअगोदरच निर्माण होतात. याउलट, बेसाल्ट किंवा पमिससारखे खडक हे, शिलारस ज्वालामुखीद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आल्यानंतर निर्माण होतात.

अतिनवतारा (supernova): वजनदार ताऱ्याच्या गाभ्यातलं इंधन संपलं की गाभा अत्यल्प काळात आकुंचन पावतो. या अंतर्स्फोटाच्या वेळी प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होऊन, तारा अत्यंत तेजानं तळपू लागतो. या तळपणाऱ्या स्थितीतल्या ताऱ्याला अतिनवतारा म्हटलं जातं.

अतिनील किरण (ultraviolet rays): मानवी डोळ्यांना दिसू न शकणारे, विशिष्ट प्रकारचे प्रकाशकिरण. या प्रकाशकिरणांची तरंगलांबी निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांपेक्षा कमी असते.

अधिक्रमण (transit): एखाद्या मोठ्या आकाराच्या अवकाशस्थ वस्तूच्या बिंबावरून छोट्या आकाराच्या अवकाशस्थ वस्तूचं बिंब सरकताना दिसणं.

अपृष्ठवंशी प्राणी (invertebrate): पाठीचा कणा नसलेले प्राणी. यात जेलिफिश, गोगलगायी, किडे, गांडुळं, जळवा, यासारख्या सजीवांचा समावेश होतो.

अमिनो आम्ल (amino acid): प्रथिनं ज्या घटकांपासून बनतात, ते आम्लस्वरूपी सेंद्रिय घटक. अमिनो आम्ल ही नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून बनलेली असतात.

अवकाश सापेक्षतावादानुसार (space): विश्वातील प्रत्येक वस्तू ज्या मोकळ्या जागेनं सामावून घेतली आहे, ती मोकळी जागा. आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षतावादानं अवकाशाला स्वतःचं अस्तित्व दिलं.

अवकाश/अंतराळ खगोलशास्त्रानुसार (space): आपल्या पृथ्वीभोवतीची पोकळी, ज्यात इतर ग्रह, तारे, दीर्घिका, इत्यादी वस्तू वसल्या आहेत.

अवरक्त किरण (infrared rays): मानवी डोळ्यांना दिसू न शकणारे, विशिष्ट प्रकारचे प्रकाश किरण. या प्रकाशकिरणांची लहरलांबी लाल रंगाच्या प्रकाशकिरणांपेक्षा अधिक असते.

अवरक्त किरण (infrared rays): मानवी डोळ्यांना दिसू न शकणारे, विशिष्ट प्रकारचे प्रकाशकिरण. या प्रकाशकिरणांची लहरलांबी लाल रंगाच्या प्रकाशकिरणांपेक्षा अधिक असते.

अवसादी खडक   (sedimentary rocks): विविध प्रकारच्या गाळापासून किंवा दगडांच्या झिजेपासून निर्माण होणारे पदार्थ कालांतरानं घट्ट होऊन त्यापासून तयार होणारे खडक. हे खडक मुख्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ आढळतात. या खडकाची उदाहरणं म्हणजे वालुकाश्म, चुनखडी, शेल.

अशनी/उल्काश्म (meteorite): सूर्यमालेत फिरणारे लहानमोठे खडक. हे खडक ग्रह-लघुग्रहांसारख्या अवकाशस्थ वस्तूंच्या टकरींतून निर्माण झालेले तुकडे असू शकतात वा निर्माण न होऊ शकलेल्या ग्रहाचे, ग्रहपूर्व भाग असू शकतात.

अश्मयुग (Stone Age):  मानवी इतिहासातील, दगडी साधनांचा वापर होत असलेला काळ. हा काळ सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वी सुरू होऊन सुमारे पाच-सहा हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आल्याचं मानलं जातं. धातूच्या साधनांचा वापर सुरू झाल्यानंतर हा काळ समाप्त झाला.

आकाशगंगा (Milky Way): आपला सूर्य ज्या दीर्घिकेचा सभासद आहे ती दीर्घिका. आपल्या या दीर्घिकेतल्या ताऱ्यांची एकूण संख्या चारशे अब्जांहून अधिक असावी.

आयन (ion): विद्युत्‌भारित अणू किंवा अणूंचा गट. अशा अणूत किंवा अणूंच्या गटात एक वा अधिक अतिरिक्त इलेक्ट्रॉन असतात किंवा एक वा अधिक इलेक्ट्रॉनची कमतरता असते. त्यामुळे हे अणू किंवा गट विद्युत्‌भाररहित न राहता, त्यावर ऋणभार वा धनभार दिसून येतो.

आयनिभवन (ionisation): अणू किंवा रेणूचं आयनात रूपांतर होण्याची क्रिया.

आरएनएन रेणू (RNA molecule – Ribonucleic Acid): सजीवाच्या पेशीतील केंद्रकात आढळणारा लांबलचक रेणू. हा रेणू डीएनए रेणूकडील जनुकीय माहिती पेशीद्रव्याला पुरवून, त्याद्वारे प्रथिनांची निर्मिती व इतर काही रासायनिक क्रिया घडवून आणतो.

आर्किअन युग (Archean Eon): सुमारे ३.८ अब्ज ते २.५ अब्ज, वर्षांपूर्वीचा काळ. या काळात पृथ्वीचं कवच निर्माण झालं, तसंच एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली.

आर्क्टिक प्रदेश (Arctic region): उत्तर ध्रुवाच्या आसपासचा, ६६.५ अक्षांशांपलीकडचा अतिथंड प्रदेश.

आर्क्टिक वृत्त (Arctic circle): उत्तर गोलार्धावरील ६६.५ अक्षांशांची रेषा.

आर्क्‍युएट फॅसिक्‍यूलस (Arcuate fasciculus): भाषा विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे मेंदूतील विविध भाग एकमेकांना जोडणारी नसांची जुडी.

उत्प्रेरक (catalyst): रासायनिक क्रिया अधिक जलद गतीनं घडवून आणणारी मूलद्रव्यं किंवा संयुगं. उत्प्रेरक हे स्वतः जरी रासायनिक क्रियेत भाग घेत असले, तरी त्यांची पुनर्निर्मिती होत असल्यानं, रासायनिक क्रियेदरम्यान त्यांच्या प्रमाणात बदल होत नाही.

उपछाया (penumbra): पृथ्वी जेव्हा सूर्यकिरण अडवते, तेव्हा तिच्या पलीकडे दोन प्रकारच्या सावल्या निर्माण होतात. त्यातली एका प्रकारची सावली. चंद्राचा या सावलीत जो भाग येतो, त्या भागावर सूर्यप्रकाश, पूर्ण नव्हे परंतु काही प्रमाणात अडवला गेलेला असतो. सोप्या भाषेत या सावलीला विरळ सावली म्हणता येईल.

उत्परिवर्तन (mutation): सजीवाच्या जनुकीय रचनेत होणारा बदल. या बदलाचा सजीवाच्या गुणधर्मांवर परिणाम होतो. हे बदल अनुकूल असू शकतात किंवा प्रतिकूल असू शकतात.

उभयचर/भू-जलचर (amphibian): जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या पृष्ठवंशी सजीवांचा गट. उदाहरणार्थ, बेडूक, सॅलामँडर, इत्यादी.

उष्णकटिबंधीय वर्षावन (tropical rainforest): विषुववृत्तालगतचं पावसाळी जंगल. अशा जंगलांतलं हवामान उष्ण व दमट असून, या जंगलांत पावसाचं प्रमाण खूप असतं. ही जंगलं दाट वृक्षराजीनं व्यापलेली असतात.

एलईडी दिवा (LED lamp): विद्युत अर्धवाहकांद्वारे प्रकाश निर्माण करणारा दिवा. उष्णतेद्वारे प्रकाश निर्माण करणाऱ्या दिव्यांच्या तुलनेत या दिव्याची, ऊर्जेचं रूपांतर प्रकाशात करण्याची क्षमता खूपच अधिक असते.

ऑक्सिडीकरण (oxidation): या प्रकारच्या रासायनिक क्रियेत, ज्या रसायनाचं ऑक्सिडीकरण होतं त्या रसायनाला ऑक्सिजनच्या अणूची प्राप्ती होते किंवा तो आपल्याकडचा इलेक्ट्रॉन गमावतो.

क… (↓↑) 

कणत्वरक (particle accelerator): कणांची एकमेकांतील आंतरक्रिया घडवून आणण्यासाठी वापरलं जाणारं साधन. अशा आंतरक्रिया घडवून आणण्यासाठी, कणांची ऊर्जा वाढवण्याची आवश्यकता असते. कणत्वरकात कणांची गती वाढवून हे साधलं जातं.

कपी (ape): वानरवर्गी प्राण्यांचा एक प्रकार. या प्रकारात बोनोबो, गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरँगउटॅन, तसंच मानवाचा समावेश होतो. कपी या प्रकारात मोडणाऱ्या प्राण्यांच्या शरीराची रचना काहीशी इतर वानरवर्गी प्राण्यांपेक्षा वेगळी असते. मुख्यतः, या प्राण्यांना शेपटी नसते, तसंच त्यांची छातीही रुंद असते. कपी हे इतर वानरवर्गी प्राण्यांपेक्षा बुद्धिमान असतात. कपी हे नरवानर गणातील प्राणी आहेत.

कवच भूशास्त्र (crust): पृथ्वीचा, बाहेरच्या बाजूचा सुमारे चाळीस किलोमीटर जाडीचा थर.

कांस्य/कासं (bronze): तांबं आणि कथलापासून बनवलेला मिश्रधातू. हा धातू तांब्याहून किंवा लोखंडाहून अधिक कठीण असतो; मात्र तो कमी तापमानाला वितळत असल्यानं, त्याच्या वस्तू बनवणं सोपं असतं.

कांस्ययुग (Bronze Age): मानवी उत्क्रांतीतील, अश्मयुगाच्या आणि लोहयुगाच्या दरम्यानचा (इ.स.पूर्व ३३०० ते इ.स.पूर्व १२००) काळ. या काळात कांस्यापासून बनवलेल्या वस्तूंचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला गेला.

कूळ  – जीवशास्त्रानुसार (family): प्राण्यांच्या वर्गीकरणातील, खालून तिसरी पायरी. कुळाची त्यानंतर, प्रजाती आणि जाती या दोन पायऱ्यांत विभागणी केलेली असते.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI): माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीअनुसार संगणकाकडून काम करून घेण्याची पद्धत. यासाठी वापरली जाणारी संगणकप्रणाली ही, माणूस एखादं काम करण्यासाठी जे तर्कशास्त्र वापरून विचार करेल, तशाच तर्कशास्त्रावर आधारलेली असते.

कृष्णपदार्थ (dark matter): आपल्या विश्वात असलेले, कोणत्याही साधनानं वेध न घेता येणारे पदार्थ. त्यांचं अस्तित्व, त्यांच्या गुरुत्वाकर्षणावरून अप्रत्यक्षपणे कळू शकलं आहे. विश्वाच्या प्रसरणाचा वेग या कृष्णपदार्थांमुळे घटत असल्याचं मानलं जातं. या पदार्थांचं स्वरूप अजून स्पष्ट झालेलं नाही.

कृष्णविवर (black hole): अनंत घनता असलेली अवकाशस्थ वस्तू – कृष्णविवराचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे ते प्रत्यक्ष दिसू शकत नाही.

केंद्रकीय क्रिया (nuclear reactions): अणूंच्या केंद्रकांचा सहभाग असणारी क्रिया. केंद्रकीय क्रियांत साधारणपणे एका मूलद्रव्याचं रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यात होतं. (रासायनिक क्रियांमध्ये संपूर्ण अणूंचा सहभाग असतो.)

क्लोरोफिल (chlorophyll): प्रकाशसंश्लेषण करू शकणाऱ्या सजीवांत अस्तित्वात असलेलं एक हिरव्या रंगाचं रसायन. हे रसायन प्रकाशसंश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावतं.

क्वार्क कण (quark particles):  मूलभूत कणांपैकी एक कण. या कणांपासून अणूतील प्रोटॉन, न्यूट्रॉन हे कण तयार झाले आहेत.

क्रिस्पर – (CRISPR – Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats): जनुकीय बदल घडवून आणण्यासाठी वापरलं जाणारं एक तंत्रज्ञान. ही पद्धत मुळात सूक्ष्मजीवाणू, त्यांच्यावर विषाणूंकडून होणाऱ्या हल्ल्याला प्रतिकार म्हणून वापरतात. याच पद्धतीचा उपयोग जनुकशास्त्रात, जनुकीय बदल घडवून आणण्यासाठी केला जातो.

ख… (↓↑) 

खगोलशास्त्रीय एकक  – ख.ए. (astronomical unit – a.u.): अंतरं दर्शवणारं खगोलशास्त्रातलं एक एकक. एक खगोलशास्त्रीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी या दरम्यानचं सरासरी अंतर (सुमारे पंधरा कोटी किलोमीटर). 

ग… (↓↑)

गण (order): प्राण्यांच्या वर्गीकरणातील, खालून चौथी पायरी. गणाची कूळ, प्रजाती आणि जाती, या तीन पायऱ्यांत विभागणी केलेली असते.

गुणसूत्र (chromosome): डीएनएचा रेणू आणि प्रथिनं यापासून बनलेली, पेशीमधली एक रचना. यात त्या सजीवांच्या गुणधर्माची माहिती साठवलेली असते.

गुरुत्वीय लहरी (gravitational waves): व्यापक सापेक्षतावादानुसार, जेव्हा एखाद्या घटनेमुळे एखाद्या स्थानावरील अवकाशाची वक्रता बदलते, तेव्हा या वक्रतेतील बदल लहरींच्या स्वरूपात दूरवर पसरतात. वक्रता ही त्या ठिकाणच्या गुरुत्वाकर्षणाची द्योतक असल्यानं, या लहरींना गुरुत्वीय लहरी म्हटलं जातं. गुरुत्वीय लहरी वस्तूच्या साध्या हालचालीमुळेही निर्माण होतात. परंतु, मुळातच त्या अत्यंत क्षीण असल्यानं, टिपता येण्याइतपत तीव्र गुरुत्वीय लहरी निर्माण होण्यासाठी मोठी, प्रलयंकारी घटना घडावी लागते.

गोंडवना (Gondwana): आजच्या दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारतीय उपखंडाचा काही भाग, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, इत्यादी भूप्रदेशांनी मिळून तयार झालेला प्राचीन एकसंध भूप्रदेश. सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या भूप्रदेशाचे, सुमारे अठरा कोटी वर्षांपूर्वी तुकडे व्हायला सुरुवात झाली. अखेर, सुमारे साडेतीन कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकालाही स्वतःचं अस्तित्व आलं.

ग्रॅनाइट (granite): एक प्रकारचा अग्निजन्य खडक. याची निर्मिती शिलारसाच्या, जमिनीच्या पृष्ठभागावर येण्याअगोदरच होते.

घ… (↓↑) 

घटनाक्षितिज (event horizon): कृष्णविवराचं गुरुत्वाकर्षण अतिशय तीव्र असल्यानं, त्याच्या केंद्रापासून विशिष्ट अंतरापर्यंत प्रकाशकिरणसुद्धा बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे या अंतराच्या आतील घटना दिसू शकत नाहीत. या विशिष्ट अंतराला ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. कृष्णविवर जितकं वजनदार, तितकं त्या कृष्णविवराचं घटनाक्षितिज मोठं. 

च… (↓↑) 

चयापचय  (metabolism): सजीवाच्या शरीरात घडून येणाऱ्या विविध जैवरासायनिक क्रिया. यांत मुख्यतः दोन प्रकारच्या क्रियांचा समावेश होतो. पहिल्या प्रकारच्या क्रिया म्हणजे, अन्नाच्या रेणूंपासून ऊर्जेची निर्मिती करणाऱ्या क्रिया आणि दुसऱ्या प्रकारच्या क्रिया म्हणजे पेशींना लागणाऱ्या रसायनांची निर्मिती करणाऱ्या क्रिया.

चुनखडी (limestone): गाळापासून बनलेला, कॅल्शिअम कार्बोनेटयुक्त खडक. या खडकात मॅग्नेशिअम कार्बोनेटही असू शकतं. हा खडक प्राण्यांच्या कवचापासून, तसंच प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार झालेला असतो. हा खडक मऊ असून त्यावर सहजपणे ओरखडे उठू शकतात. या खडकाचा रंग साधारणपणे राखाडी असतो. मात्र, तो पांढऱ्या, पिवळ्या किंवा तपकिरी रंगांतही आढळतो.

चुनखडी (limestone): गाळापासून बनलेला, कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खडक. या खडकात मॅग्नेशिअम कार्बोनेटही असू शकतं. हा खडक प्राण्यांच्या कवचापासून, तसंच प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार झालेला असतो. हा खडक मऊ असून त्यावर सहजपणे ओरखडे उठू शकतात. या खडकाचा रंग साधारणपणे राखाडी असतो. मात्र तो पांढऱ्या, पिवळ्या किंवा तपकिरी रंगांतही आढळतो.

छ… (↓↑) 

छायाकल्प चंद्रग्रहण (penumbral lunar eclipse): चंद्र जेव्हा फक्त पृथ्वीच्या विरळ सावलीतून प्रवास करत असतो, तेव्हा लागलेलं ग्रहण. या ग्रहणात चंद्राच्या तेजात फारसा फरक पडत नाही. मात्र प्रत्येक खंडग्रास किंवा खग्रास चंद्रगहणाच्या पूर्वी व नंतर, चंद्र छायाकल्प स्थितीतून जातो. 

ज… (↓↑) 

जड पाणी (heavy water): हायड्रोजनऐवजी हायड्रोजनचा समस्थानिक असणाऱ्या ड्यूटेरिअमपासून बनलेलं पाणी. (रासायनिक संज्ञाः D2O)

जनुक (gene): सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतील काही विशिष्ट (रासायनिक) रचना. या रचनांत विविध प्रकारची माहिती रासायनिक स्वरूपात साठवलेली असते. एखाद्या सजीवाची रचना विशिष्ट प्रकारची असण्यासाठी हे जनुक कारणीभूत असतात. तसंच, पेशींकडून एखादी क्रिया करून घेण्यातही जनुकांचा सहभाग असतो.

जनुकीय आराखडा (genome): सजीवाच्या संपूर्ण जनुकीय माहितीचा संच. ही माहिती सजीवाच्या पेशींतील डीएनए रेणूंत साठवलेली असते. प्रत्येक दोन सजीवांच्या जनुकीय आराखड्यात किंचित का होईना, परंतु फरक हा असतोच.

जनुकीय खूण (genetic signature): सजीवाच्या जनुकक्रमातील एखादा वैशिष्ट्यपूर्ण (लक्षवेधी) भाग.

जागतिक स्थानदर्शक यंत्रणा (Global Positioning System  – GPS): एखाद्या ठिकाणाचं, पृथ्वीवरचं स्थान दर्शवणारी यंत्रणा. एकमेकांच्या संपर्कात असणाऱ्या कृत्रिम उपग्रहांद्वारे रेडिओलहरींची देवाणघेवाण करून, ही यंत्रणा हे स्थान नक्की करते.

जाती  जीवशास्त्रानुसार (species): प्राण्यांच्या वर्गीकरणातील, अगदी खालची पायरी. एकाच जातीतील दोन प्राण्यांत पूर्ण साम्य असतं.

जीवाश्म (fossil): पुरातन काळातील प्राण्यांचे दगडी स्वरूपातले अवशेष. मातीत गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवशेषांतील सूक्ष्मछिद्रांत पाणी शिरून, कालांतरानं या पाण्यात विरघळलेल्या क्षारांचं स्फटिकीभवन होतं आणि या अवशेषांना हे दगडी स्वरूप प्राप्त होतं.

जुरासिक काळ (Jurassic Period): एकोणीस कोटी वर्षांपासून ते साडेतेरा कोटी वर्षं, या दरम्यानचा काळ. या काळात पृथ्वीवर डायनोसॉर अस्तित्वात होते, तसंच वनस्पती या मुख्यतः सूचिपर्णी प्रकारच्या होत्या.

जोडतारे (double star/binary star): गुरुत्वाकर्षणानं एकमेकांशी जखडलेल्या ताऱ्यांची जोडी. हे दोन्ही तारे एका समान बिंदूभोवती प्रदक्षिणा घालत असतात.

ट… (↓↑) 

टायरॅनोसॉरस रेक्स/टी-रेक्स (Tyrannosaurus Rex/T-Rex): सरीसृपांच्या डायनोसॉरस कुळातील एक जाती. ही जाती सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. आकारानं अवाढव्य आणि मांसाहारी असणाऱ्या या जातीतील प्राण्यांचं वास्तव्य आजच्या उत्तर अमेरिकेत होतं.

टेरोसॉर (pterosaur): सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेला, उडणाऱ्या सरीसृपांचा गण.

ड… (↓↑) 

डायनोसॉर (dinosaur): सरीसृपांच्या प्रकारातील प्राण्यांचा एक गट. हे प्राणी ६.६ कोटी वर्षांपूर्वी नामशेष झाले.

डीएनए रेणू (DNA molecule – Deoxyribonucleic acid): सजीवाच्या पेशीच्या केंद्रकात आढळणारा लांबलचक रेणू. सजीवाच्या वाढीबद्दलची, त्याच्या पुनरुत्पादनाबद्दलची माहिती या रेणूत रासायनिक रचनेच्या स्वरूपात साठवलेली असते.

डेनिसोव्हा (Denisova): पाच लाख वर्षांपूर्वी ते तीस हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात अस्तित्वात असलेली एक मनुष्यसदृश जाती/उपजाती.

ड्यूटेरिअम (deuterium): हायड्रोजनचा समस्थानिक. याच्या केंद्रकात एका प्रोटॉनबरोबर एका न्यूट्रॉनचा समावेश असल्यानं, ड्यूटेरिअमच्या अणूचं वजन हायड्रोजनच्या अणूच्या दुप्पट असतं.

त… (↓↑) 

तारकासमूह (constellation): आपल्याला दिसणारं आकाश एकूण ८८ भागांत विभागलं आहे. हा प्रत्येक भाग म्हणजे तारकासमूह. तारकासमूहांचे आकार वेगवेगळे असून, प्रत्येक तारकासमूहाला त्यातील ताऱ्यांच्या काल्पनिक आकारानुसार नावं दिली गेली आहेत.

तीव्र केंद्रकीय बल (strong nuclear force): चार मूलभूत बलांपैकी एक बल. हे बल प्रोटॉन, न्यूट्रॉनमधील क्वार्क या कणांना, तसंच अणूच्या केंद्रकाला एकत्र बांधून ठेवतं.

त्सूनामी (Tsunami): प्रचंड विनाशकारी लाट. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा लघुग्रहाच्या आघातामुळे समुद्रात अशी त्सूनामी निर्माण होते.

थ… (↓↑) 

थिआ (Theia): ग्रहमालेच्या बाल्यावस्थेच्या काळात अस्तित्वात असलेला ग्रह. चंद्राच्या निर्मितीला या ग्रहाची पृथ्वीशी झालेली टक्कर कारणीभूत ठरल्याचं मानलं जातं. 

द… (↓↑) 

दीर्घिका (galaxy): तारे, वायू, धुळीचे ढग, इत्यादींचा प्रचंड मोठा समूह. प्रत्येक दीर्घिकेत अब्जावधी ताऱ्यांचा समावेश असतो.

ध… (↓↑) 

ध्रुवीय प्रकाश (polar light / aurora): ध्रुव प्रदेशांच्या आसपासच्या प्रदेशातील आकाशात रात्री दिसणारा रंगीत प्रकाश. या प्रकाशाची निर्मिती सूर्याकडून येणाऱ्या विद्युत्‌भारीत कणांच्या पृथ्वीवरील वातावरणाशी होणाऱ्या क्रियेद्वारे होते.

न… (↓↑) 

नरवानर (primate): माकडं आणि कपी हे ज्या गणात येतात तो गण.

निअँडरटाल (Neanderthal): आजच्या मानवाच्या उत्क्रांतीपूर्वी निर्माण झालेली, परंतु मानवी उत्क्रांतीनंतरही टिकून राहिलेली ही एक मानवसदृश जाती आहे. सुमारे चार लाख वर्षांपूर्वी ही जाती निर्माण होऊन सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी ती नाहीशी झाली. या जातीची शारीरिक ठेवण बरीचशी माणसासारखीच होती. तसंच त्यांना माणसाप्रमाणे अग्नीचा आणि दगडी शस्त्रांचा वापर अवगत होता.

निद्रितावस्था (hibernation): प्रतिकूल परिस्थितीत सजीव काही काळापुरते ज्या निष्क्रिय स्थितीत जातात, ती स्थिती.

निरपेक्ष शून्य तापमान (Absolute zero temperature): पदार्थाचे भौतिकशास्त्रीयदृष्ट्या शक्य असलेले सर्वांत कमी तापमान. या तापमानाला अणूंची गती शून्य होते.

निष्क्रिय वायू (inert gases) – कोणत्याही मूलद्रव्याबरोबर संयुग न होऊ शकणारे वायू. आवर्तसारणीतील शेवटच्या स्तंभात यांना जागा दिली आहे.

प… (↓↑) 

परिसंस्था (ecosystem): कोणत्याही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र राहणारी, एकमेकांवर अवलंबून असणारी सजीवांची साखळी.

पर्णछिद्र (stomata): वनस्पतीच्या पानाच्या पृष्ठभागावरील थरातील छिद्रं. या छिद्रांद्वारे वनस्पती कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरात घेतात, तसंच बाष्पाचं उत्सर्जन करतात.

पुंजवाद/पुंजीय भौतिकशास्त्र (Quantum Physics): अतिशय सूक्ष्म कणांच्या गुणधर्मांचा, त्या सूक्ष्म पातळीवर जाऊन, अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची शाखा. पुंजीय भौतिकशास्त्रानुसार ऊर्जा वा प्रकाश हा पुंजांच्या स्वरूपात उत्सर्जित होतो. या शाखेच्या संकल्पनेनुसार, कणांना लहरींचेही गुणधर्म असतात तर प्रकाशाला कणांचेही गुणधर्म असतात.

पृष्ठवंशी/कणाधारी (vertebrate): पाठीचा कणा असलेले प्राणी. यांत सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप, मासे, इत्यादींचा समावेश होतो.

प्रकाशवर्ष (light year): दूरची अंतरं मोजण्याचं खगोलशास्त्रातलं एकक. प्रकाश एका वर्षात जितकं अंतर पार करतो, तितकं अंतर.

प्रकाशसंश्लेषण  (photosynthesis): हवेतील कार्बन डायऑक्साइडपासून, क्लोरोफिल (हरीतद्रव्य), पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्यानं साखरेचे रेणू बनवण्याची क्रिया. हिरव्या वनस्पती, तसंच शैवालासारखे काही सजीव हे प्रकाशसंश्लेषण करू शकतात. साखरेच्या स्वरूपातील हे पदार्थ हा अनेक सजीवांचा आहार असतो.

प्रछाया (umbra): पृथ्वी जेव्हा सूर्यकिरण अडवते, तेव्हा तिच्या पलीकडे दोन प्रकारच्या सावल्या निर्माण होतात. त्यातली एक प्रकारची सावली. चंद्राचा या सावलीत जो भाग येतो, त्या भागावर सूर्यप्रकाश पूर्णपणे अडवला गेलेला असतो. सोप्या भाषेत या सावलीला दाट सावली म्हणता येईल.

प्रजाती (genus): प्राण्यांच्या वर्गीकरणातील, खालून दुसरी पायरी. एकाच प्रजातीतील दोन जातींच्या प्राण्यांत जवळपास पूर्ण साम्य असतं.

प्रतिपदार्थ (antimatter): एखाद्या पदार्थाच्या उलटे गुणधर्म असणारा पदार्थ. उदाहरणार्थ, प्रतिइलेक्ट्रॉन, प्रतिप्रोटॉन, इत्यादी. यांपैकी प्रतिइलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉनच असतो, परंतु त्याच्यावर ऋण विद्युतभाराऐवजी धन विद्युतभार असतो. त्याचप्रकारे प्रतिप्रोटॉन हा धनभारित असण्याऐवजी ऋणभारित असतो.

प्रथिन (protein): प्रत्येक पेशीतला, अत्यंक आवश्यक असा नायट्रोजनयुक्त रेणू. हे रेणू अमिनो आम्लाचे बहुवारिक असतात.

प्रावरण (mantle): पृथ्वीच्या कवचाखालील सुमारे २,९०० किलोमीटर जाडीचा थर. हा मुख्यतः खडक व अर्धवट घनस्वरूपातील शिलारसापासून बनला आहे. हे प्रावरण स्वरूपानुसार, ‘वरचं प्रावरण’ आणि ‘खालचं प्रावरण’ अशा दोन भागांचं बनलं आहे.

प्लवक (plankton): पाण्यातले सूक्ष्म सजीव. यांत अनेक प्रकारच्या वनस्पतींचा व प्राण्यांचा समावेश होतो. अनेक जलचरांचं हे खाद्य असून, अन्नसाखळीत ते महत्त्वाची भूमिका बजावतात.

ब… (↓↑) 

बहुवारिक (polymer): सारख्याच प्रकारचे छोटे रेणू एकमेकांना जोडून तयार झालेला, साखळीच्या स्वरूपातला लांबलचक रेणू.

बाह्यग्रह (exoplanet): सूर्याव्यतिरिक्त इतर ताऱ्यांभोवतीच्या ग्रहमालेतला ग्रह. अशा अनेक ग्रहमाला आपल्या विश्वात अस्तित्वात आहेत.

बी-क्वार्क/बॉटम क्वार्क/ब्युटी क्वार्क कण (b-quark/bottom quark/beauty quark particles): क्वार्क या मूलभूत कणांपैकी वजनदार क्वार्कचा एक प्रकार

बी-मेसॉन कण (b-meson particles): बी-क्वार्क कणांपासून बनलेला मेसॉन कणांचा एक प्रकार.

भ… (↓↑) 

भूपट्ट (tectonic plate): पृथ्वीभोवतीचं शिलावरण एकूण सुमारे पंधरा लहान-मोठ्या तुकड्यांत विभागलं आहे. या तुकड्यांना भूपट्ट म्हटलं जातं. हे भूपट्ट स्थिर नसून ते सतत अत्यंत धिम्या गतीनं एकमेकांच्या सापेक्ष सरकत असतात. या हालचालींमुळेच पृथ्वीचा नकाशा सतत बदलत आहे. भूपट्ट्यांच्या सीमांवरचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अस्थिर असतो.

भूलहरी/भूकंप लहरी (seismic waves): पृथ्वीच्या (वा इतर ग्रह-उपग्रहांच्या) अंतर्भागात घडून येणाऱ्या घडामोडींमुळे जमिनीत निर्माण होणाऱ्या लहरी. या लहरी भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, भूस्खलन इत्यादी घटनांमुळे निर्माण होतात. या लहरींचं विश्लेषण करून पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना कळू शकते.

म… (↓↑) 

मास स्पेक्ट्रोमीटर (mass spectrometer): अणू-रेणू आयनिभूत केल्यास चुंबकीय क्षेत्रातील त्यांचा मार्ग हा, त्यात्या अणू वा रेणूच्या वस्तुमानानुसार व त्यावरील विद्युतभारानुसार ठरतो. मास स्पेक्ट्रोमीटर या साधनात या बाबीचा उपयोग करून अणू-रेणूंचं विश्लेषण केलं जातं. मास स्पेक्ट्रोमीटर इतर साधनांना जोडून त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या निर्माण करण्यात आल्या आहेत.

मूलद्रव्य (element): एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला आणि ज्याची आणखी मूलभूत पदार्थात विभागणी करता येत नाही, असा पदार्थ.

मूलभूत कण (fundamental/elementary particle): विश्वातील अविभाज्य कण. इलेक्ट्रॉन, म्यूऑन, क्वार्क, इत्यादी. अणूतील प्रॉटॉन, न्यूट्रॉन हे कण क्वार्क या मूलभूत कणांपासून बनले आहेत.

मृदुकाय प्राणी (mollusc): अपृष्ठवंशी (कणा नसलेले) मृदू शरीराचे प्राणी. असे प्राणी बहुधा कवचात बंदिस्त होऊन वावरत असतात.

मेथिल (methyl): मिथेनच्या रेणूपासून बनलेला, कार्बन आणि हायड्रोजन या मूलद्रव्यांचा एक रासायनिक गट.

मेसॉन कण (meson particles): हॅड्रॉन कणांचा एक प्रकार. यांतील क्वार्कची संख्या ही सम असते.

म्यूऑन कण (muon particle): इलेक्ट्रॉनसारखेच, परंतु इलेक्ट्रॉनपेक्षा सुमारे दोनशेपट जड असणारे मूलभूत कण. हे कण ‘लेप्टॉन’ गटात येतात.

र… (↓↑) 

रूपांतरित खडक (metamorphic rocks): रूपांतरित खडकांची निर्मिती ही अग्निजन्य किंवा अवसादी खडकांवरील उष्णता आणि दाबाच्या परिणामामुळे होते. संगमरवर, नायस, शिस्ट ही अशा प्रकारच्या खडकांची उदाहरणं आहेत. या खडकांची निर्मिती मुख्यतः जमिनीखाली खोलवर होते.

रेडिओ खगोलशास्त्र (radio astronomy): विविध अवकाशस्थ वस्तूंकडून येणाऱ्या रेडिओ लहरींच्या निरीक्षणांद्वारे, त्या वस्तूंचा अभ्यास करणारी खगोलशास्त्राची शाखा.

रेडिओ लहरी/रेडिओ किरण (radio waves): आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाशकिरणांपेक्षा अधिक लहरलांबी असणारे, विशिष्ट प्रकाशकिरण. डोळ्यांना दिसू न शकणाऱ्या या प्रकाशकिरणांचा उपयोग संदेशवहनासाठी वा माहिती प्रसारणासाठी केला जातो. अनेक अवकाशस्थ वस्तूंकडून या प्रकाशकिरणांचं उत्सर्जन होतं.

ल… (↓↑) 

लघुग्रह (asteroid/minor planet): सूर्यमालेत फिरणारे लहानमोठे खडक. हे खडक अवकाशस्थ वस्तूंच्या टकरींतून निर्माण झालेले तुकडे असू शकतात वा निर्माण न होऊ शकलेल्या ग्रहाचे, ग्रहपूर्व भाग असू शकतात.

लायडर (Lidar – Light Detection and Ranging): लेझर किरणांच्या साहाय्यानं, एखाद्या ठिकाणचं त्रिमितीय चित्र निर्माण करणारं तंत्रज्ञान. यात एका स्रोतापासून सोडलेल्या लेझर किरणांना, त्या ठिकाणच्या बिंदूंवर परावर्तित होऊन संवेदकापर्यंत पोहोचण्यास लागणारा कालावधी मोजला जातो. या कालावधीतील फरकावरून त्या ठिकाणचं त्रिमितीय चित्र तयार केलं जातं.

लार्ज हॅड्रॉन कोलायडर (Large Hadron Collider): सर्न (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च) या संस्थेतर्फे स्विट्झर्‌लँडमध्ये जिनिव्हाजवळ उभारलेला शक्तिशाली कणत्वरक. यात गतीद्वारे कणांची ऊर्जा वाढवून त्यांच्या टकरी घडवून आणल्या जातात व त्याद्वारे कणांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.

लाल राक्षसी तारा (Red giant star): ताऱ्याची ही एक मृत्यूपूर्व स्थिती आहे. अशा ताऱ्याच्या गाभ्यातलं हायड्रोजनरूपी इंधन संपुष्टात आलेलं असतं. मात्र अशा ताऱ्याच्या गाभ्याचं तापमान वाढून हेलिअमच्या ज्वलनाला सुरुवात झालेली असते. अशा ताऱ्याच्या गाभ्याबाहेरच्या भागाचं तापमानही वाढल्यानं, त्याचा बाह्यभागाचं प्रसरण होऊन ताऱ्याचा आकार प्रचंड प्रमाणात वाढतो. या प्रसरणामुळे ताऱ्याच्या वातावरणाचं तापमान कमी होऊन, तारा लाल रंग धारण करतो. या लाल ताऱ्याला, त्याच्या प्रचंड आकारामुळे ‘लाल राक्षसी तारा’ म्हटलं जातं.

लेझर किरण (Laser – light amplification by stimulated emission of radiation): एका विशिष्ट पद्धतीनं निर्माण केलेले, एकाच तरंगलांबीचे प्रकाश किरण. असे किरण निर्माण करण्यास, ऊर्जा पुरवून एखाद्या पदार्थातील अणूंना उत्तेजित केलं जातं. हे उत्तेजित अणू आपल्याकडील ऊर्जा त्यानंतर, एकाच लहरलांबीच्या प्रकाशकिरणांच्या स्वरूपात उत्सर्जित करतात. हे नवनिर्मित किरण अणूंमध्ये शोषले जाऊन, ही क्रिया पुनः पुनः घडून येते व त्याद्वारे त्या पदार्थातून त्या विशिष्ट लहरलांबीचा तीव्र प्रकाशझोत उत्सर्जित होतो.

लेप्टॉन कण (lepton particle): क्षीण केंद्रकीय बलाद्वारे आंतरक्रियांत भाग घेणाऱ्या मूलभूत कणांचा गट. या गटात इलेक्ट्रॉन, म्यूऑन, इत्यादी कणांचा समावेश होतो.

व… (↓↑) 

वाढचक्रं (growth rings): वृक्षाच्या खोडाच्या आडव्या छेदावर दिसणारी वर्तुळं. वृक्षाच्या खोडावर दरवर्षी नव्या थराची भर पडते. यामुळे वृक्षाच्या खोडात दरवर्षी नवं वर्तुळ निर्माण होत असतं. या वर्तुळांची संख्या मोजून वृक्षाचं वय कळू शकतं.

विकर (enzyme): शरीरात घडणाऱ्या विविध रासायनिक क्रियांत उत्प्रेरकाची भूमिका बजावणारी सेंद्रिय संयुगं. विकर म्हणजे प्रत्यक्षात विविध प्रकारची प्रथिनं असतात.

विखंडन केंद्रकीय (fission – nuclear): अणुकेंद्रकाचे दोन भाग होण्याची क्रिया. अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी युरेनिअमच्या केंद्रकाचं, न्यूट्रॉनद्वारे विखंडन घडवून आणलं जातं. या केंद्रकीय क्रियेतून मोठ्या प्रमाणावर ऊर्जानिर्मिती होते.

विद्युत्‌चुंबकीय बल (electromagnetic force): चार मूलभूत बलांपैकी एक बल. हे बल विद्युत आणि चुंबकीय बलाचं एकत्रीकरण आहे.

वैश्विक किरण (cosmic rays): वैश्विक किरण हे अत्यंत शक्तिशाली किरण असून त्यांची विश्वात सर्वत्र सतत निर्मिती होत असते. या कणांत मुख्यतः विद्युतभारीत कणांचा समावेश असतो. हे कण सूर्याच्या अंतर्भागात निर्माण होतात, दूरवरच्या अतिनवताऱ्यांत निर्माण होतात, तसंच ते आपल्या दीर्घिकेबाहेरील काही स्रोतांत निर्माण होतात. या वैश्विक किरणांतील सुमारे ८९ टक्के कण हे हायड्रोजनची केंद्रके असतात, सुमारे एक टक्का कण हे हेलिअमची केंद्रके असतात, तर उर्वरित सुमारे नऊ टक्के कण हे  इतर काही वजनदार मूलद्रव्यांची केंद्रके असतात.

व्यतीकरण (interference – of light): एकाच लहरलांबीच्या दोन प्रकाशलहरी एकमेकांत मिसळतात, तेव्हा त्यांचा एकमेकांवर परिणाम घडून येतो. या परिणामाला ‘व्यतीकरण’ म्हटलं जातं. व्यतीकरणामुळे लहरींतील आंदोलनांत बदल होतो व आंदोलनांची तीव्रता कमी-जास्त होऊन पट्ट्यापट्ट्यांनी बनलेला एक आकृतिबंध निर्माण होतो. या आकृतिबंधाचं स्वरूप हे, दोन्ही प्रकाशलहरी एकमेकांसापेक्ष एकमेकांत केव्हा मिसळल्या, यावर अवलंबून असतं.

व्यापक सापेक्षतावाद (General theory of Relativity): व्यापक सापेक्षतावाद हा आइन्स्टाइननं मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त आहे. या सिद्धान्तात गुरुत्वाकर्षण हे बलाच्या स्वरूपात नव्हे, तर ते अवकाशाच्या वक्रतेच्या स्वरूपात दर्शवलं जातं. प्रत्येक वस्तूच्या आसपासचं अवकाश हे त्या वस्तूच्या वस्तुमानानुसार वक्र होतं. वस्तुमान जितकं जास्त, तितकं त्या वस्तूभोवतीचं अवकाश अधिक वक्र. अवकाशाच्या या वक्राकारानुसारच, तिच्या सान्निध्यात येणाऱ्या इतर वस्तूंचा मार्ग ठरतो.

श… (↓↑) 

श्वेतखुजा तारा (white dwarf): ताऱ्याच्या मृत्यूनंतर ताऱ्याच्या बाह्यभागातले वायू ताऱ्याला सोडून जातात. सूर्याच्या तुलनेत साधारणपणे आठपट वजन असणाऱ्या ताऱ्यांच्या बाबतीत, त्यानंतर अत्यंत आकुंचित स्वरूपातला गाभा मागे उरतो. साधारणपणे पृथ्वीच्या आकाराचा, अत्यंत घन असा हा गाभा म्हणजे श्वेतखुजा तारा. या छोट्या आकाराच्या ताऱ्याचे तापमान साधारणपणे दहा-बारा हजार अंश सेल्सिअसच्या आसपास असल्यानं, त्याला निळसर-पांढरा रंग प्राप्त झालेला असतो.

शिलारस (magma/lava): वितळलेले अथवा अर्धवट वितळलेल्या अवस्थेतील खडक. शिलारस हा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असताना, त्याला इंग्रजीत magma म्हटलं जातं, तर जेव्हा तो पृष्ठभागावर येतो, तेव्हा त्याला lava म्हटलं जातं. शिलारसाचं तापमान सहाशे-सातशे अंश सेल्सिअसपासून अकराशे-बाराशे अंश सेल्सिअसपर्यंत असतं.

शिलावरण (lithosphere): पृथ्वीचं कवच आणि प्रावरणाचा अगदी वरचा थर मिळून तयार झालेला सुमारे शंभर किलोमीटर जाडीचा घनस्वरूपातील थर. हा थर तुकड्यांच्या स्वरूपात असून, या तुकड्यांची सतत हालचाल चालू असते.

शैवाल (alga-e): प्रकाशसंश्लेषण करण्यास आवश्यक ती क्लोरोफिलसारखी (हरितद्रव्य) रंगद्रव्यं बाळगणारे सजीव. हे सजीव जरी वनस्पतींप्रमाणे प्रकाशसंश्लेषण करू शकत असले, तरी त्यांच्याकडे वनस्पतींना असतात तशा, मूळं, खोड किंवा पानांचा अभाव असतो. शैवाल हे एकपेशीय असू शकतं वा बहुपेशीय असू शकतं.

स… (↓↑) 

संकर (hybridisation): एखाद्या प्राण्याच्या वा वनस्पतीच्या दोन जातींतून निर्माण झालेली मिश्रजाती.

संधिपाद (arthropod): कायटिन आणि प्रथिनांपासून तयार झालेलं जाड त्वचेचं कवच शरीरावर असलेले प्राणी. त्यांच्या शरीराचे, एकमेकांना जोडले गेलेले वेगवेगळे भाग दाखवता येतात. या प्राण्यांत शेवंडं, खेकडे, विविध प्रकारचे कीटक, तसेच गोमीसारखे शतपाद व सहस्रपाद प्राणी, इत्यादींचा समावेश होतो.

संप्रेरक (hormone): अंतःस्त्रावी ग्रंथींत निर्माण होणारे विशिष्ट स्त्राव. शरीरातील जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यात या संप्रेरकांचा सहभाग असतो.

संस्पंदन (resonance): काही विशिष्ट कंपनसंख्या असणाऱ्या, ध्वनीच्या किंवा प्रकाशाच्या लहरी जेव्हा एखाद्या कंप पावणाऱ्या वस्तूवर आदळतात, तेव्हा या वस्तूच्या आंदोलनांची तीव्रता वाढते. या स्थितीला संस्पंदन म्हणतात.

समतुल्यतेचं तत्त्व (Principle of Equivalence): जडत्वामुळे निर्माण होणारे बल आणि गरुत्वाकर्षणीय बल, यांची समतुल्यता दर्शवणारे तत्त्व.

समस्थानिक (isotope): एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळा अणुभार असलेले अणू. एकाच मूलद्रव्याच्या दोन समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात; परंतु त्यांचे केंद्रकीय गुणधर्म वेगळे असतात. अशा अणूंच्या केंद्रकातील न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते.

सरीसृप (reptile): प्राणिसृष्टीतील प्राण्यांचा एक वर्ग. चार पायांवर चालणाऱ्या, कणा असणाऱ्या, हवेत श्वसन करणाऱ्या, अंडी घालणाऱ्या, खवलेधारी प्राण्यांचा यात समावेश होतो. उदा. मगरी, साप, पाली, कासवं, इत्यादी.

सायनोबॅक्टेरिआ (cyanobacteria): प्रकाशसंश्लेषण करू शकणारे निळ्या वा किरमिजी रंगाचे सूक्ष्मजीवाणू. आपल्याकडील हरितद्रव्याद्वारे प्रकाशसंश्लेषण करणारे हे सूक्ष्मजीवाणू बहुधा एकपेशीय असतात.

सुप्त उष्णता (Latent heat): जेव्हा एखाद्या पदार्थाचं स्थित्यंतर होतं (उदा. बाष्परूपातून द्रवरूपात, द्रवरूपातून घनरूपात, वगैरे) तेव्हा ती क्रिया घडून येण्यासाठी उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा शोषली वा उत्सर्जित केली जाते. या उष्णतेला सुप्त उष्णता म्हटलं जातं.

सौरकण (solar particles): सूर्याकडून उत्सर्जित होणारे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन तसंच विविध मूलद्रव्यांचे आयनिभूत अणू.

सौरचक्र (solar cycle): सूर्याच्या सक्रियतेचं चक्र. सूर्य सुमारे दर अकरा वर्षांनी अतिशय सक्रिय झालेला असतो.

सौरज्वाला (solar flare): सूर्याच्या पृष्ठभागावरून उफाळणाऱ्या ज्वाळा. सूर्याच्या सक्रिय अवस्थेत या ज्वाळांची संख्या वाढलेली असते.

सौरप्रभा (solar corona): सूर्याच्या वातावरणाचा, बाहेरचा भाग. खग्रास सूर्यग्रहणात झाकलेल्या सूर्यबिंबाभोवती सौरप्रभा सहजगत्या दृष्टीस पडते.

सौरवारे (solar wind): सूर्याकडून होणारा विद्युत्‌भारित कणांचा – सौरकणांचा – मारा. यांत मुख्यतः हायड्रोजनच्या केंद्रकांचा, म्हणजे प्रोटॉनचा समावेश असतो.

स्टँडर्ड मॉडेल भौतिकशास्त्रानुसार (Standard Model): विश्वातील विविध मूलभूत कणांतील आंतरक्रियांचा मागोवा घेणारं प्रारूप. या प्रारूपातून विविध कणांची निर्मिती, त्यांचे गुणधर्म, यांचं चित्र उभं केलं गेलं आहे.

स्थिरावरण (stratosphere): जमिनीपासून सुमारे २० किलोमीटर ते ५० किलोमीटर इतक्‍या उंचीपर्यंतचा वातावरणातला थर. ओझोनची निर्मिती या थरात होते. या थरात बाष्पाचं प्रमाण अत्यंत अल्प असल्यानं, इथं ढगांचाही जवळपास अभाव असतो.

स्पंदक (pulsar): ज्याच्याकडून नियमित स्पंदनांच्या स्वरूपात रेडिओ लहरी उत्सर्जित होतात, असा तारा.

स्वादग्रंथी (taste buds): खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थाची चव ओळखणाऱ्या, जिभेच्या पृष्ठभागावरील ग्रंथी. या ग्रंथींत विविध प्रकारच्या पेशी अस्तित्वात असतात. या पेशींद्वारे पदार्थाची चव ओळखली जाते.

ह… (↓↑) 

हबल अंतराळ दुर्बीण (Hubble Space Telescope): अवकाशस्थ वस्तूंचं अंतराळातून निरीक्षण करण्यासाठी, नासा या संस्थेनं अंतराळात पाठवलेली दुर्बीण. ही दुर्बीण सुमारे ५४० किलोमीटर ऊंचीवरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालीत आहे.

हरितगृह परिणाम (greenhouse effect): वातावरणातील वायूंची, उष्णता स्वतःकडे राखून ठेवण्याची क्षमता वेगवेगळी असते. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, यांसारखे वायू अधिक प्रमाणात उष्णता बाळगू शकतात. त्यामुळे असे वायू तापमानवाढीला कारणीभूत ठरतात. या वायूंमुळे होणाऱ्या तापमानवाढीच्या परिणामाला हरितगृह परिणाम म्हटलं जातं. (हरितगृहांचा वापर उद्यानक्षेत्रात, तापमान राखण्याच्या दृष्टीनं मुद्दाम केला जातो.)

हरितगृह वायू (greenhouse gases): हरितगृहासारखा परिणाम घडवून आणणारे वायू. हे वायू तापमानवाढीस कारणीभूत ठरले असल्याचं दिसून आलं आहे. यांत कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइडसारख्या विविध वायूंचा समावश होतो.

हिमयुग (ice age): पृथ्वीवरचा अतिशय थंड हवामानाचा दीर्घ कालखंड. आतापर्यंत असे अनेक कालखंड होऊन गेले आहेत. हजारो वर्षं टिकणाऱ्या या कालखडांत, पृथ्वीचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणावर बर्फानं आच्छादलेला असतो.

हिमस्तर (ice sheet): अतिथंड प्रदेशातील जमिनीवर जमा झालेला, दीर्घकाळ अस्तित्वात राहणारा बर्फाचा स्थिर जाड थर. असे हिमस्तर आज अंटार्क्टिका आणि ग्रीनलँड येथे आढळतात. हिमयुगातील अतिथंड काळात यांचं अस्तित्व इतर ठिकाणीही दिसून येतं. या हिमस्तराची जाडी काही किलोमीटरपर्यंत असू शकते.

हिमोग्लोबिन (haemoglobin): प्राणवायूचा वाहक असणारं, लाल रक्तपेशींतील एक प्रथिन. लाल रक्तपेशींना त्यांचा लाल रंग या प्रथिनामुळे मिळतो.

हॅड्रॉन कण (hadron particles): क्वार्कपासून निर्माण झालेले वजनदार कण. यांत प्रोटॉन, न्यूट्रॉनचा समावेश होतो. हे कण मुख्यतः तीव्र केंद्रकीय बलांद्वारे आंतरक्रियांत भाग घेतात.

होमो सेपिअन्स (Homo sapiens): मानवाचं जैवशास्त्रीय नाव. प्रजाती – होमो आणि जाती – होमो सेपिअन्स.

क्ष… (↓↑) 

क्षपण (reduction): या प्रकारच्या रासायनिक क्रियेत, ज्या रसायनाचं क्षपण होतं, ते रसायन आपल्याकडचा ऑक्सिजनचा अणू गमावतं किंवा त्याला हायड्रोजन वा इलेक्ट्रॉनची प्राप्ती होते.

क्षीण केंद्रकीय बल (weak nuclear force): चार मूलभूत बलांपैकी एक बल. हे बल अस्थिर कणांच्या किरणोत्साराशी संबंधित आहे.

क्षोभावरण (troposphere): जमिनीपासून सुमारे वीस किलोमीटर उंचीपर्यंतचा वातावरणाचा थर. वादळ-विजा, पाऊस, इत्यादींची निर्मिती या थरात होते.